मतदान टक्केवारी वाढण्यासाठी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर

रायगड, दि.२५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रेवती गायकर, जोस्ना पाडियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यासह  विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

डॉ. कल्याणकर म्हणाले की, जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच आदिवासी क्षेत्रातील मतदारांचे मतदान देखील महत्त्वाचे आहे याकडे लक्ष दिले जावे. मोठी गावे, शहरांमधील गर्दीचे प्रभाग येथे मतदारांची संख्या मोठी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची (होम वोटिंग) सुविधा दिली आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यात व्हावी. दिव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान होईल या दृष्टीने काम केले जावे. दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात.

पोस्टल व होम वोटिंगद्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे, या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण काळजीपूर्वक केले जावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक संनियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखण्याच्या सूचना डॉ. कल्याणकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, निवडणूक उन्हाळ्यात होत असल्याने मतदानादिवशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, मतदारांच्या रांगांसाठी व्हरंडा अथवा मंडप, शेडद्वारे सावली निर्माण करण्यात यावी.

दिव्यांग मतदारांचे मतदान सहज होण्यासाठी समाजसेवी संस्थाची मदत घेतली जावी. होम वोटिंग साठी जाणाऱ्या पथकांनी मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान गोपनीय राहील या दृष्टीने दक्षता घेतली जावी. मागच्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघात ६२ टक्के मतदान झाले होते यावर्षी त्यात वाढ अपेक्षित असून देण्यात आलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे श्री. जावळे म्हणाले.

निवडणूक विषयक विविध समितीनिहाय कामकाजाची माहिती सादर

यावेळी निवडणूक विषयक विविध समितीनिहाय कामकाजाची माहिती सादर करण्यात आली. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्ष, मतदार जागरूकता व सहभागिता कार्यक्रम (स्वीप), सी व्हिजील ॲप, सक्षम ॲप, ईव्हीएम, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचे मतदान, पोस्टल मतदान व होम वोटिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक प्रशिक्षण यासह विविध बाबींची माहिती देण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विभाग विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक मतदान पूर्वतयारी बाबत माहिती सादर केली.

निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी

रायगड लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापूर्वी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमची सुरक्षा, पायाभूत सुविधा, पॉवर बॅकअप आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर सुविधांच्या  आढावा  डॉ. कल्याणकर यांनी यावेळी घेतला.

कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *