बीडमध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल

बीड दि. १७ (जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात अवैध मद्य वाहतूक तसेच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत या अंतर्गत 92 प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता अमलात आली आणि त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे या प्रकारच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आचारसंहिता कालावधी सुरु झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तथा विक्री विरुद्ध जोरदार कारवाया सुरु केल्या असून आतापर्यंत एकूण 92 गुन्हे नोंद करण्यात आलेले असून त्यात 77 आरोपींना अटक तसेच  ₹ 12.91 /- लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत केलेल्या कारवाईत प्रामुख्याने हातभट्टी निर्मिती केंद्रांवर तसेच अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई यांचा समावेश आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आचारसंहिता अनुषंगाने प्रमुख राज्य व राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांवर संशयित वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. हॉटेल व धाबाचालकांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्या असून अवैध मद्यविक्री अथवा सेवन करतांना कोणी आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती यांच्या दैनंदिन मद्यविक्रीवर देखील ऑनलाईन प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. विहित नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *