निवडणूक कालावधीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही असणार सज्ज; मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने उचलली पावले

मुंबई उपनगर, दि. 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात  सार्वत्रिक निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा घेऊन निवडणूक कालावधीत यंत्रणेने सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

सर्व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी तयारी ठेवावी

वाढता उन्हाळा आणि अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा यासह सर्व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी तयारी ठेवावी, असे क्षीरसागर यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासन हे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींमुळे मतदान प्रक्रियेची गती मंदावली जाऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मतदानाला येणाऱ्या मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यादृष्टीने प्रशासन खबरदारी घेतली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनी सांगितले.

आपत्कालीन मदत यंत्रणांना सज्जतेचा इशारा

वॉर्ड स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशन्स, हॉस्पिटल, रुग्णवाहिका यांची उपलब्धता याची माहिती ठेवणे आवश्यक आहे तसेच या यंत्रणांनीही या काळात सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

याशिवाय, वाढत्या उन्हाळ्याच्या अनुषंगाने हवामान विभागाने जारी केलेली माहिती तात्काळ निवडणूक यंत्रणेला देणे अत्यावश्यक राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर योग्य ती आवश्यक कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य होणार असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

—–000——

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *