रायगडमधील आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड(जिमाका)दि.12:- आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर बु.येथे  मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते.

एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेण, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. आदिवासी समाजाची युवक आणि प्राथमिक शिक्षक हे पथनाट्य सादर करीत आहेत. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर बु. येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसिलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, आदिवासी वाड्या वस्त्या, गावे येथील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र मतदार दूत नेमण्यात येणार आहे. या दुतामार्फत गावातील प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वांना भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी केले.

आदिवासी बहुल गावामधील मतदार काम व नोकरीसाठी कुठल्या आस्थापनांमध्ये  जात असतील तरी तेथे सुट्टी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. सर्व आदिवासी मतदारांना भर पगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबत कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी सांगितले.

या पथनाट्याचे लेखन/दिग्दर्शक श्री.राजू लहू बांगारे यांनी केले आहे. तसेच गीतकार दामोदर शिद, वादक सतिश खाणेकर आहेत. या पथनाट्यात राजू बांगारे, दामोदर शिद, ज्ञानेश्वर शिद, गणपत पारधी, साई बांगारे, श्रेयश वारगुडे, वेदांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्रीमती अहिरराव यांनी केले. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील वाडया, वस्ती, गावामध्ये पथनाट्य आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. मतदानाच्या जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल त्यांनी माहिती दिली.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *