लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. २७ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. सर्व मतदारांनी लोकशाही बळकटीकरणासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले.

मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज सकाळी ७ वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे, आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे, वैद्यकीय  अधिकारी वैभव पाटील, मुख्य अग्नीशमन अधिकारी सुनील माळी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर, श्री. बोडस, अरूण लोंढे, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, सायकल पट्टू, क्रीडा प्रेमी, नागरिक, विविध शाळा, विद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रॅलीतील सहभागींचे अभिनंदन करून, ७ मे रोजी मतदान करणे व इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केले.

विश्रामबाग सांगली येथून काढण्यात आलेली सायकल रॅली पुढे पुष्कराज चौक – राम मंदिर मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ७ मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित सायकलपटू, पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात या सायकल रॅली कार्यक्रमाची सांगता झाली.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *