मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक, दिनांक 26 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :  मतदार जनजागृती संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्यासह अधिकारी तसेच जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, केड्राई, उद्योग, आरोग्य संस्था व स्वीपचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या काळात ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी होती, त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. याबाबत सर्वच नोडल अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु यासाठी शासकीय यंत्रणांसह सर्वच स्तरातील नामांकित संस्था, युवक व नागरिक यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. यादृष्टीने मतदान जनजागृती करण्यासाठी पुरेसा कालावधी असून जनजागृतीच्या दृष्टीने वाव आहे. यासाठी सर्वांचेच प्रयत्नशील योगदान आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येकाने पूर्ण क्षमतेने काम करून नागरिकांना मतदान करण्यासाठी उद्युक्त करावयाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, या निवडणुकीसाठी तरूण नवमतदार सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महाविद्यालयातील युवकांनाही मतदार जनजागृतीसाठी सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने तसेच महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी मुक्त संवाद साधून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील. याबाबत चर्चा केली. या साधकबाधक चर्चेतून आलेल्या सूचनांचे व उपक्रमांचे जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, जिल्ह्यात मतदान जनजागृती करण्यासाठी  वोट कर नाशिककर, मी ठरवेल माझा खासदार व हातभर तक्रारींना वोटभर उपाय असे उपक्रम त्याचप्रमाणे मतदारदूत या संकल्पनेतून, पथनाट्यातून जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत. शाळा व महाविद्यालय स्तरावरही मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमधील सिनेकलाकार, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, खेळाडू यांचाही सहभाग मतदान जनजागृतीसाठी केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी यावेळी उपस्थित संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी यांचे आभार मानले.

 

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *