लोकसभा निवडणूकसंदर्भात नोडल अधिकारी यांचा घेतला आढावा

अमरावती, दि. 20 (जिमाका):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आज निवडणूकविषयक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजय जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी कैलास घोडके तसेच नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी तसेच दूरदृष्टयप्रणालीव्दारे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यावेळी उपस्थित होते.

आढावा बैठकीमध्ये प्रत्येक नोडल अधिकारी यांनी निवडणूक तयारीसंदर्भात सादरीकरण केले. यामध्ये स्वीप नोडल अधिकारी यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक खर्च समिती, प्रसारमाध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती, आचारसंहिता कक्ष, भरारी पथक, नामनिर्देशन पथक, पोस्टल बॅलेट तसेच इतर नोडल अधिकारी यांनी निवडणूक पुर्वतयारीसंदर्भात सादरीकरण केले.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, मतदारांचे जनजागृती करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृती कार्यक्रम राबवावे. जिल्हा व शहराच्या मुख्य ठिकाणी पोस्टर, बॅनर व इतर माध्यमातून मतदान करण्याबाबत मतदारांना प्रोत्साहित करावे. तसेच समाज माध्यमावरही युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम रावबावे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून अमरावती मतदार संघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सर्व विभागानी समन्वय साधून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक संदर्भातील कामे सुनियोजित पद्धतीने पार पाडावी. यासाठी संबंधित विभागासोबत सतत संपर्कात रहावे. उमेदवारांनी रॅली, सभा व अन्य कामांसाठी सादर केलेले परवाने तपासणी करुन तातडीने उपलब्ध करुन द्यावे. परवागीशिवाय कोणतेही प्रचारसाहित्य किंवा कार्यक्रम होत असल्यास अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करा. तसेच सी व्हिजिल ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कारवाई करुन संबंधितावर गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी  श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *