मुंबई, दि. १४: खेड तालुक्यातील पदरवाडी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात येत असून या गावच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पदरवाडी गावचे पुनर्वसन करणेबाबत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात बैठक झाली. आमदार दिलीप मोहिते, पुणे विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी पुणे ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे तहसिलदार प्रशांत बेडसे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे, सहसचिव सत्यनारायण बजाज, अपर तहसीलदार स्नेहा शिंदे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, पदरवाडी गावाच्या कायम स्वरुपी पुनर्वसनास भूसंपादन व अन्य बाबींसाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या गावाचे पुनर्वसन होईपर्यंत पावसाळा व आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतरासह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/