अपारंपरिक, नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांचे शुभारंभ व भूमिपूजन

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) चे महामंडळाची सहयोगी कंपनी म्हणून उत्कृष्ट काम

मुंबई दि. ११ : राज्यात नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे. अपारंपरिक व नविनीकरणीय ऊर्जा स्रोतांतील सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन या पर्यायांवर अंमलबजावणी केली जात आहे. ग्रीन हायड्रोजनचा वापरास प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित)  सहयोगी कंपनीच्या वतीने विविध जिल्ह्यातील ५ भव्य प्रकल्पांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आज शुभारंभ व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. मुंबई मधील सह्याद्री अतिथीगृह येथे आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात  महाप्रितने बृहमुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने फ्लोटिंग सोलार अडीच हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार,  मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान प्रकल्प (एम.एस.एम.इ) अंतर्गत ४०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा शुभारंभ, ठाणे जिल्ह्यातील दुधनी- वापे येथे कार्बन न्यूट्रल प्रकल्पाचे भूमीपूजन, सातारा जिल्ह्यातील मोळ या ठिकाणी १०० मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन, रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे एकात्मिक शितगृह प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील व कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष झा हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह  चहल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महाप्रित व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमोल शिंदे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, तीन वर्षांपासून महाप्रितने महामंडळाची सहयोगी कंपनी म्हणून काम करताना उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. राज्य सरकारने ग्लोबल वार्मिंग व क्लायमेट चेंजसाठी लढताना ऊर्जा क्षेत्रात अपारंपरिक स्रोतांतून वीज निर्मिती करण्यास प्राधान्य दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील विकासाची गती वाढविली आहे. यासाठी महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण काम केले जात आहे.

ते म्हणाले की, उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी उद्योगस्नेही धोरण, रेड कार्पेट, सिंगल विंडो सिस्ट‍िम, सबसिडी व विविध उपायांमुळे महाराष्ट्र हे औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे राज्य ठरले आहे. दावोस येथे विदेशी गुंतवणुकीसाठी झालेल्या सामंजस्य करारांपैकी 73 हजार कोटी गुंतवणूक प्रत्यक्षात कार्यवाही होत आहे. राज्यातील युवकांच्या कौशल्य विकासासाठी मोठे काम होत आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात टाटा कन्सल्टन्सीच्या सहकार्याने 5 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देता येईल, असे केंद्र स्थापन करण्यात येत असून यामुळे तेथील युवकांना रोजगार व विकासाची मोठी संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्रात काम केले जात असून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट मुंबई महानगर प्रदेश (एम एम आर डी ए) च्या योगदानातून सहज गाठेल तर संपूर्ण राज्यातून यात वाढ होईल. राज्यात होत असणाऱ्या नवीन उपक्रमांमधून चांगले व गुणवत्तापूर्ण काम कालबद्ध वेळेत व्हावेत, अशीही अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 

महाराष्ट्र एक ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. इकोसिस्टम मजबूत करताना उद्योग, रोजगार निर्मिती केली जाते आहे. सौर ऊर्जेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात असून देशाच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राने उद्योग, ऊर्जा आदी क्षेत्रांच्या माध्यमातून एक ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गती घेतली आहे. जलविद्युत, औष्णिक वीज निर्मिती या ऊर्जा स्रोतांना मर्यादा असून यामुळे राज्य सौर ऊर्जा, पवनऊर्जा अशा अपारंपरिक, नवीनीकरणीय ऊर्जा स्रोतांवर भर देत आहे. असे सांगून, उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दावोस मधील विविध सामंजस्य करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतणूक होत आहेत याबाबत समाधान व्यक्त केले.

कोकण रेल्वेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले धन्यवाद

रत्नागिरी येथील कोकण रेल्वे, अपेडा व महाप्रित यांच्या सहयोगातून 2 हजार टन क्षमतेच्या शीतगृह प्रकल्पामुळे कोकणातील आंबा व मासे निर्यात वाढणार असून या प्रकल्पासाठी रेल्वेने विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिल्याने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी धन्यवाद व्यक्त केले.

धरण क्षेत्रात होणार नाविन्यपूर्ण “फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट”

बृहन्मुंबई महानगरपालिका व महाप्रित यांच्या सहकार्यातून सौर ऊर्जा निर्मितीसाठी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांवर फ्लोटिंग सोलार प्रकल्पाचे सामंजस्य करारावर महानगरपालिका आयुक्त श्री. चहल व महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिंदे यांनी स्वाक्षरी करून संचिकेचे आदान – प्रदान केले. या प्रकल्पात 6 हजार कोटी रुपये गुंतवणुक होत आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील या प्रकल्पांच्या शुभारंभ व भूमिपूजन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, संबंधित  जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महामंडळाचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्षात व ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.

०००००

किरण वाघ/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *