विकासकामांच्या दर्जा, गुणवत्तेकडे महापालिकेने अधिक लक्ष केंद्रीत करावे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. ९ : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी व नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून भरीव निधी उपलब्ध करुन दिला जातो. ज्याप्रमाणे स्वत:चे घर उभारण्यासाठी आपण जातीने लक्ष घालतो, त्याप्रमाणे जिल्ह्याची पायाभूत विकासकामे पूर्णत्वास नेताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

अमरावती महापालिकेच्या अखत्यारितीतील सुमारे साडे चौदा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने महापालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, प्रताप अडसळ, रवी राणा, माजी महापौर चेतन गावंडे, संजय नरवने, महापालिका आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, महिला व बालकल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, श्रीमती वासनकर यांच्यासह  मनपा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून निधी संबंधित विभागांना उपलब्ध करुन दिला जातो. जिल्ह्यातील रचनात्मक व पायाभूत विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असते. त्यानुसार प्रत्येक कार्यान्वयन यंत्रणांनी आपापली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडावी. राज्य शासनाकडून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला भरीव निधी दिला जात आहे. शहरात भटक्या श्वानांकडून चावा घेतल्याने जखमी झालेल्यांची संख्या अधिक आहे. कुत्र्यांना मारता येत नाही. तसेच त्यांना दूर नेवून टाकणे हाही उपाय नाही. त्यावर उपाय म्हणून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेने विशेष अभियान राबवावे. तसेच प्राण्यांची आक्रमकता कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजातील गोर गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचे युपीएससी व एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढण्यासाठी चांगल्या सोयी-सुविधा असलेल्या अभ्यासिकेंची निर्मिती करण्यात यावी, असे ते म्हणाले. नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महापालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांची व प्रस्तावित असलेल्या  विविध विकासकामांची माहिती आयुक्त श्री. पवार यांनी पालकमंत्र्यांना यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती, डी पी रस्त्यांची कामे, फाउंटन निर्मिती, टॉऊन हॉलचे नुतणीकरण, ई-बसेस प्रकल्प आदी प्रकल्पांना राज्य शासनाकडून निधी मिळण्याबाबतची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांसमोर यावेळी मांडली.

लोकार्पण व भुमिपूजन करण्यात आलेली विकासकामे

जिल्हा नियोजन योजनेतून प्राप्त झालेल्या सुमारे साडे चौदा कोटी रुपयांच्या निधीतून  महापालिकेची विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम, ई-टपाल सेवा, घनकचरा सी ॲन्ड डी वेस्ट व्यवस्थापन प्रकल्प, जिल्हा नियोजन समिती नाविन्यपूर्ण घटक, मोठ्या प्राण्यासाठी शवदाहिनी उभारणे, रहाटगाव व कोंडेश्वर येथे प्राणी निवारा केंद्र तथा पशु उपचार केंद्राची उभारणी, कॅम्प स्थित संत गाडगेबाबा अभ्यासिका, 15 वा वित्त आयोग अंतर्गत उत्तम नगर येथे आरोग्य मंदिराचे बांधकाम आदी कामांचा समावेश असून पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण व भुमिपूजन करण्यात आले.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *