महिलांनी स्वकतृत्वाने आपले भविष्य घडवावे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि.९: महिलांना संधी दिल्यास त्या आपल्या कर्तृत्वाचा मेहनतीने ठसा उमटवितात. काही तरी नवीन करण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाल्याने त्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. महिलांनीही स्वत:ला कमजोर न समजता, दिलेल्या सर्व संधीच स्वकतृत्वाने सोनं केलं पाहिजे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित महिला भगिनींना केले.

जिल्हा परिषद प्रशासन, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदान येथे स्वयंसहाय्यता बचत गटांचे ‘वैदर्भी जिल्हा प्रदर्शनी’ व जागर स्त्री शक्ती कार्यक्रम आणि अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत तीन दिवसीय कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत विजेता ठरलेल्या महिला बचतगट, ग्राम पंचायतींना पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार रवी राणा, निवेदीता दिघडे, जयंत डेहनकर, माजी महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, डिआडीएच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके, मआविमचे व्यवस्थापक सुनील सोसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महिला बचत गटाद्वारे निर्माण करण्यात विविध उत्पादनांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. त्यांच्याव्दारे निर्माण करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विपनणासाठी जिल्हा परिषदेने व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे. महिला महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व माहिती सर्वदूर होत आहे. जिल्हा परिषदेचा हा स्तुत्य उपक्रम असून अमरावती शहरात उभारण्यात आलेल्या धारणीच्या महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या ‘मेळघाट हाट’ च्या धर्तीवर बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी आणखी विक्री केंद्र स्थापित करण्यात यावेत, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महिलांनी आता उद्योग-व्यवसायात पुढाकार घ्यावा, त्यासाठी राज्य शासनाद्वारे विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज मिळवून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मोहपात्रा यांनी महिला महोत्सवाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य व प्रगतीबाबत तसेच जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनांतून ग्रामीण भागात झालेले विकासकामे याविषयी पालकमंत्री महोदयांना प्रास्ताविकातून माहिती दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनीत सर्वात जासत उत्पादन विक्री झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सधारकांना पालकमंत्र्यांचे हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुर्यकांतादेवी पोटे-पाटील प्रित्यर्थ सर्वात जास्त बचतगटांच्या उत्पादन विक्री करणाऱ्या स्टॉल्सधारकांनाही प्रथम, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकांचे वितरण, आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण, तसेच अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत विजेत्या ठरलेल्या ग्राम पंचायतींना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *