पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महाशिवरात्रीनिमित्त घेतले ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे दर्शन

 बीड, दि. (जिमाका) : राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैद्यनाथांचे मध्यरात्रीनंतर उशिरा मनोभावे दर्शन घेतले.

आज सर्वदूर महाशिवरात्रीचे पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जात असून धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा वैद्यनाथांचे दर्शन घेत राज्यातील शेतकरी कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू द्या, अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथांच्या चरणी केली.

दरम्यान धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने सबंध वैद्यनाथ मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुमारे 21 प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. या आकर्षक सजावटीमुळे सबंध वैद्यनाथ मंदिर व परिसर लखलखून निघाला असून भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या दिसून येत आहेत.

मंत्री श्री. मुंडे यांनी मुंबईवरून बीड जिल्ह्यात दाखल होतात सर्वप्रथम अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची आस्तेवाईकपणे चौकशी करून त्यांच्यावरील उपचारांची माहिती घेतली व डॉक्टरांना योग्य त्या सूचना केल्या.

त्यानंतर वैद्यनाथ मंदिरात त्यांनी विधिवत पूजन करून वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे प्रा.बाबासाहेब देशमुख, अनिल तांदळे, डॉ. प्रसाद देशपांडे, सुरेश टाक, राजेंद्र सोनी, अभयकुमार ठक्कर, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी, परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे आदी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *