डेन्मार्क संसदेच्या तीन उपाध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट 

मुंबई, दि. ८: डेन्मार्क संसदेचे तीन उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

भारत – डेन्मार्क राजनैतिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमध्ये संसदीय सहकार्य, व्यापार, हरित ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या उद्देशाने भेटीचे आयोजन केले असल्याचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन यांनी राज्यपालांना सांगितले.

डेन्मार्कची लोकसंख्या अतिशय कमी असून आपल्या देशाला भारताकडून कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात भारताशी स्थलांतर करार देखील केला असल्याचे त्यांनी सांगितले.

डेन्मार्क भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार असून डेन्मार्कच्या लार्सन अँड टुब्रो व मर्स्क कंपन्यांची नावे भारतात सर्वतोमुखी आहेत. डेन्मार्कने भारताला कौशल्य विकास, दुग्ध क्रांती, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य क्षेत्रात सहकार्य केल्यास त्याचे स्वागतच होईल असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने राज्य तसेच डेन्मार्क मधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व सत्र देवाणघेवाण झाल्यास त्याचा उभयपक्षी विद्यार्थ्यांना फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले. बैठकीला डेन्मार्क संसदेचे वरिष्ठ अधिकारी व डेन्मार्कचे मुंबईतील उप वाणिज्यदूत हेन्री करकाडा प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *