ठाणे, दि. ८: कळवा पूर्व येथील भास्कर नगर परिसरातील आदर्श चाळ येथे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली येत असल्याने घरे वाहून जाण्याची शक्यता असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हापती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी तहसिलदार उमेश पाटील, ठाणे महानगरपालिका व वन विभाग प्रशासनाला घटनास्थळी तात्काळ पाहणी करून आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार उमेश पाटील यांनी संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला. त्यानंतर कळवा येथील ग्राम महसूल अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी तसेच स्थानिक नगरसेविका चंद्रकांता साळी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील नाले चोकअप झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती.
संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. ठाणे महानगरपालिकेमार्फत चोकअप झालेल्या नाल्यांची तातडीने साफसफाई करण्यात आली. त्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून पाणी आता योग्य पद्धतीने ड्रेनेजमार्फत वाहून जात आहे. प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे सध्या कोणत्याही घरात पाणी नसून परिसरातील सर्व घरे सुरक्षित आहेत.
या घटनेत कोणतेही घर पडलेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, ठाणे महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून तातडीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य धोका टळला असून परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
००००