२२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान राज्यभर ‘कृषी महोत्सव’चे आयोजन – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ७: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागामार्फत राज्यभर ‘कृषी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार असून, या महोत्सवाचे सविस्तर आणि प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले.

मंत्रालयातील दालनात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषी महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्टचे संचालक एम. जे. प्रदीप चंद्रन,नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प संचालक मीनल करनवार, कृषी संचालक रफीक नाईकवडी, अविनाश बोरकर, विनयकुमार अवटी, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री भरणे म्हणाले की, यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत असून, महिला शेतकरी विधेयकही विधिमंडळात सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी महोत्सवात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देत त्यांच्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि विविध कृषीविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

ते पुढे म्हणाले की, पेरणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर आयोजित होणाऱ्या या महोत्सवात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, अत्याधुनिक कृषी अवजारे, यांत्रिकीकरण, पीक व्यवस्थापन, मूल्यवर्धन आणि कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरविण्यात यावे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळून आधुनिक शेतीचा स्वीकार करण्यास चालना मिळेल.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करून कृषी महोत्सव प्रभावीपणे राबविण्यात यावा, अशा सूचनाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *