जिल्ह्यातील ७२३८८ शेतक-यांची माहिती पोर्टलवर अपलोड

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना – 2026’

चंद्रपूर, दि. ७ : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’ चा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 72 हजार 388 शेतक-यांच्या खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यात राष्ट्रीयकृत बँकेचे 28 हजार 572 तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (सीडीसीसी) 43 हजार 816 खात्यांचा समावेश आहे.

आजही शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. मात्र गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतीला बसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतक-यांना दिलासा देण्यासाठी व पीक कर्जाची थकीत रक्कम माफ करून, चालू खरीप हंगामात पुन्हा पीक कर्ज मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’ जाहीर केली आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले एक किंवा अनेक बँकांचे अल्पमुदत पीक कर्ज, 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेले कर्ज आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाच्या रकमेसाठी शासनाच्या वतीने 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

तसेच 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्यास वरील रक्कम संबंधित शेतक-यांनी 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत जमा केल्यास उर्वरीत 2 लाख रुपये कर्जमाफीची रक्कम राज्य सरकार बँकेत जमा करणार आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांमधील पात्र 28 हजार 572 तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 43 हजार 816 कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

पोर्टलवर अपलोड केलेल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदारांची संख्या : बँक ऑफ महाराष्ट्र (16020 खाते), भारतीय स्टेट बँक (3430 खाते), महाराष्ट्र ग्रामीण बँक (4248 खाते), बँक ऑफ बडोदा (20), पंजाब नॅशनल बँक (50), इंडियन बँक (211), बँक ऑफ इंडिया (3495), आयडीबीआय (778), आयसीआयसीआय (4), युनियन बँक ऑफ इंडिया (173), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (120), इंडियन ओव्हरसीज बँक (13) आणि ॲक्सीस बँक (10 खाते).

सीडीसीसी बँकेच्या तालुकानिहाय पात्र खातेदारांची संख्या : चंद्रपूर तालुका (1122 खाते), सिंदेवाही  (2405),  राजुरा (3014), नागभीड (3851), भद्रावती (2092), ब्रम्हपुरी (4670), चिमूर (5451), पोंभुर्णा  (2187), मूल (2033), वरोरा (4076), कोरपना (5663), सावली (2794), गोंडपिपरी (3891) आणि बल्लारपूर तालुका (567 खाते).

शेतकऱ्यांसाठी आवाहन : योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल.

००००००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *