‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.3 (जिमाका):-  “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन आपल्या दारी” च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. दि.15 एप्रिल 2023 पासून “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हयात एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.     
“शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदान, कल्याण शिळफाटा, कोळे, कल्याण येथे करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, किसन कथॊरे,  संजय केळकर, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, आमदार गीता जैन, आमदार मनिषा कायंदे, माजी आमदार रविंद्र फाटक, एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त संजय मुखर्जी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, हे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली. यातून समृध्दी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत आपण पहिल्या क्रमांकावर आणला.
स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. यामुळे प्रदूषण झपाट्याने कमी होत आहे. हे राज्य शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. यातूनच मराठा आरक्षणाचाही प्रश्न आपण सोडवला. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्य सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान पद्धतीने होत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यामुळे देशाचा सन्मान जगात वाढल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
  बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी हे शासन आता ठाणे जिल्ह्यात 6 व 7 मार्च रोजी “नमो महा रोजगार” मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे. या महारोजगार मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा, असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करीत आहे. हे राज्य शासन जनतेसाठी काम करत असल्याने जनता “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पहिल्यांदाच सुरू केला. सामान्य माणसाला आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात सतत जावे लागायचे. त्यापेक्षा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा.  या उद्देशाने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे एकही पात्र लाभार्थी लाभापासून  वंचित  राहणार नाही, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना  पोचविण्यासाठी काम सुरु आहे. “शासन आपल्या दारी “या योजनेच्या माध्यमातून शासनाचा  प्रत्येक अधिकारी प्रत्येक गरजू लाभार्थ्याच्या  घरापर्यत  जावून योजना पोहोचवित आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून  जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब व्यक्तीचे बँकेमध्ये खाते सुरू केले आहे. “शासन आपल्या दारी” योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जातो. जनसामान्यांच्या हिताचा असा हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी व संबधीत अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की,  जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी आले आहेत. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे. कल्याण पूर्व मध्ये सर्वात प्रथम “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम झाला. यामध्ये 20 हजार  लोकांना याचा लाभ दिला. तळागाळातील लोकांपर्यंत योजना  पोहोचण्यासाठी “शासन आपल्या दारी” हा  कार्यक्रम घेण्यात आला आहे.
ते म्हणाले की, मेट्रो- 12 च्या निविदाचे काम पूर्ण झाले असून त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे पसरत आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो होत आहे. येणाऱ्या काळात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आणणार आहोत. तिसरी मुंबई ही नवी मुंबई ते कल्याण यामध्ये विकसित होत आहे. एम.एम.आर.डी.ए. नवीन डीपीआर तयार करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरविले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम येथे होत आहे. अंबरनाथ मध्ये दीडशे कोटी अनुदान मिळाले, त्याचे आज भूमीपूजन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली तसेच सभामंडपात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोबाईल टॉर्च दाखवून आणि त्याला उपस्थित नागरिकांनीही आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले. तसेच या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचे लाभ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई मेट्रो – 12 (कल्याण ते तळोजा) प्रकल्प कामाचा ई शुभारंभ आणि कल्याण पश्चिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ई उद्धाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
ooooo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *