मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या प्रदान

मुंबई दि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना केवळ ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

महाराष्ट्र कृषी सेवा गट ब म्हणजेच मंडळ कृषी अधिकारी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल 2022 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या.या परीक्षांमध्ये आयोगाने पात्र ठरवलेल्या उमेदवारांची यादी जुलै 2023 मध्ये कृषी विभागास प्राप्त झाली. उत्तीर्ण उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशी सर्वसाधारण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया बरीच वेळखाऊ असते.

मात्र याबाबतीत केवळ ७ महिने इतक्या विक्रमी वेळेत नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या बाबींच्या अधीन राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.  यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सर्व नवनियुक्त मंडळ कृषी अधिकारी यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

हे अधिकारी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देतील तसेच कृषी विभागाचा लौकिक वाढवण्यात योगदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

०००

दत्तात्रय कोकरे/वि.सं.अ./

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *