दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा दि.२५ (जिमाका) : तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, निरा देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात 121 कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील 15 लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जीहे कठापूर )चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहूल कूल, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता पुणे हनुमंत गुनाले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्याधिकारी याशनी नागराजन,पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सातारा सिंचन मंडळ अधिक्षक अभियंता अरुण नाईक, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक दशके जी भूमी थेंब थेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत जलपूजन करण्याची संधी आज आपल्याला मिळाली आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या भागात पाणी यावे यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी अथक परिश्रम आणि मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षाला आज चांगले फळ आले आहे. आपण विदर्भातून असल्याने दुष्काळी जनतेला ज्या यातना भोगाव्या लागतात त्याची जाणीव आहे . त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातील दुष्काळ संपविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी योजना गतीने पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार .

माण खटाव तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गुरुवर्य काही लक्ष्मण रावजी इनामदार उपसा सिंचन (जिहे कठापूर ) योजनेला फेर मान्यता देण्यात आली आहे. त्यातून माण तालुक्यातील 27 गावे व खटाव तालुक्यातील 40 गावी अशी एकूण 67 गावे व त्यातील एक लाख 75 हजार 803 लाभधारकांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे. यातून 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . या योजनेसाठी जवळपास 1331 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते याचे या रूपाने फार मोठे मॉडेल तयार झाले आहे..
जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्यास आपण सुरुवात केलीय त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेर वाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्याच्या समर्पित भावनेने आमदार जयकुमार गोरे यांनी काम केल्याचे सांगितले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवधर, सोळशी धरणांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी विविध पाणी योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. दुष्काळी भागामध्ये उद्योग उभे राहावे यासाठी कॉरिडॉरचा विषय लवकर तडीस न्यावा, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *