जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना गृहोपयोगी संचांचे वाटप करणार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.२२ (जिमाका) : महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत राज्यभर गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना या साहित्याचा संप वाटप करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

नेर येथे साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, पराग पिंगळे, सुभाष भोयर, नामदेवराव खोब्रागडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात १ लाख ४१ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. त्यापैकी ८६ हजार कामगारांची नोंदणी जिवीत असल्याने त्यांना संचाचे वाटप केले जात आहे. उर्वरीत कामगारांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण केल्यास अशा कामगारांसह नवीन नोंदणी केलेल्या कामगारांना देखील गृहोपयोगी साहित्य संचाचा लाभ देऊ, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

वर्षात ९० दिवस कामगार म्हणून काम केल्यास त्यांची कामगार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा कामगारांनी त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करुन घ्यावे व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.राठोड यांनी केले. जिल्ह्यात जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आजच्या साहित्य संच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तालुकास्तरावरच कामगारांना संच उपलब्ध झाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जिल्हास्तरीय शुभारंभाला नेर तालुक्यातील २ हजार १४६ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्याहस्ते संचाचे वाटप करण्यात आले. या संचात १७ प्रकारच्या एकून ३० गृहोपयोगी साहित्याचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच तालुका ठिकाणी साहित्य संच वाटपाचे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पराग पिंगळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी केले. कार्यक्रमास नेर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *