परभणीच्या विकासाला नवी दिशा देणारे स्वतंत्र नियोजन भवन – पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

परभणी, दि. ०२ (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडले.

परभणी जिल्ह्याची वेगाने वाढत असलेली लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याची नितांत आवश्यकता होती. हे भवन परभणीच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्यासाठी सुंदर अशी नियोजन भवन इमारत लवकरच उभी राहणार आहे. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन अधिकारी आणि संबंधित विभागांना आधुनिक, सुसज्ज कार्यालयीन जागा उपलब्ध होईल. जेणेकरून जिल्ह्याच्या विकास आराखड्यांचे नियोजन, बजेट वाटप, प्रकल्पांचे मूल्यमापन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.

प्रास्ताविक कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *