अधिकाधिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सूक्ष्‍म नियोजन करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

पुणे, दि.२०: शासनाच्या कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा २ मार्च २०२४ रोजी बारामती येथे आयोजित करण्यात आला असून औद्योगिक आस्थापनांकडून रिक्त पदांची नोंदणी केली जाईल आणि त्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना रोजगार मिळवून देता येईल यासाठी सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.

विधानभवन पुणे येथे आयोजित महारोजगार मेळाव्याच्या आढावा बैठकीत दूरदृष्यप्रणालीद्वारे मंत्री श्री. लोढा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपायुक्त वर्षा लड्डा- उंटवाल, कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार आदी उपस्थित होते.

श्री.लोढा म्हणाले, कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतांना सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नियोक्ते, कारखानदार, व्यापारी व सुशिक्षित बेरोजगार यांचे एकत्रित मेळावे घेण्यात येत आहेत. मेळावा यशस्वी होण्यासाठी नियोक्त्यांची मागणी आणि त्यानुसार कुशल मनुष्यबळ याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी औद्योगिक संस्था, महाविद्यालये, रोजगार क्षेत्रात काम करणाऱ्यास संस्था यांच्याशी संवाद साधावा. मेळाव्याचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना उपयोग व्हावा यासाठी व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील संधी याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनही ठेवण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.लोढा यांनी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महारोजगार मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना व्हावी यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी करावी. स्थानिक औद्योगिक संघटनांशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील मोठ्या उद्योगसंस्थांना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात यावे. मेळाव्यात आलेल्या उमेदवारांना कोणतीही समस्या येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, मेळाव्यात सुमारे १५० आस्थापना सहभागी होणार असून जागेचे नियोजन, नोंदणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा करण्यात येत आहेत. युवकांना अधिक रोजगार देणारे क्षेत्र निवडण्यात आले असून नियोक्त्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. परिसरातील जिल्ह्यातील उमेदवारांनाही या संधीचा लाभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीला विभागातील सातारा, सोलापूर,कोल्हापूर व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या-त्या जिल्ह्यात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *