अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर / मुंबई , दि. १६ फेब्रुवारी २०२४ :- ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्यारूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार अश्विन अघोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले की,  त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्समधील यशस्वी कारकीर्दीनंतर आपल्या ‘घनघौर’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवरून खऱ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणाऱ्या अश्विनजींच्या अकाली जाण्याने तयार झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हीडियो वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले. माध्यम क्षेत्रातील सद्य प्रलोभनांपासून दूर राहून वैचारिक पत्रकारितेचा एक आदर्श अश्विन अघोर यांनी उभा केला. राष्ट्रविरोधी नरेटिव्ह खोडून काढताना नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचा अतिशय चांगला उपयोग त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात करून घेतला. पर्यावरण आणि जैवविविधतेचाही त्यांचा चांगला अभ्यास होता.

ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच मित्र परिवाराला या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ देवो, असे सांगून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अश्विन अघोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *