मुंबई, दि. १६ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, ३ रा. मजला, शारदा मंगल कार्यालय, १७२, नायगाव, दादर (पूर्व) येथे होणार असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०-३० वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष लेखक, कवी, समीक्षक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत मुंबई शहर व जिल्ह्याच्या ग्रंथोत्सवाचे आयोजनानिमित्त ग्रंथ दिंडी, प्रदर्शन, विक्री, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असून या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्यिक-रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ग्रंथोत्सवामधील कार्यक्रम-
गुरूवार दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. ग्रंथ दिंडीचा मार्ग : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू.) मनपा अग्निशमन केंद्र, दादर- रणजित बुधकर चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग – निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज चौक – – एस.एस. वाघ मार्ग-महात्मा गांधी चौक- महात्मा फुले रोड – शाहीर मधु कडू चौक – कार्यक्रम स्थळापर्यंत आहे. त्यानंतरसकाळी १०.३० वाजता ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार कालीदास कोळंबकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उप सचिव प्रताप लुबाळ उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११ ते १ प्रमुख मान्यवरांचे स्वागत व मनोगत. महाराष्ट्रातील वाचन चळवळ उपक्रमांतर्गत १००० किशोर मासिकाचे वितरण, (प्रातिनिधिक स्वरूपात १० विद्यार्थी) दु.२ ते ३.३० आभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रम मध्ये “महाराष्ट्रीय भारतरत्ने” दु. ४ ते ५.३० लेखक तुमच्या भेटीला मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांची मुलाखत कवी विजय सावंत घेणार आहेत.
शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी २०२४ सकाळी. १०.३० वाजता मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनाचे भाषा संचालनालयाच्या भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते उद्घाटन. स. ११ वाजता माझे वाचन या विषयावर डॉ. नरेंद्र जाधव (अर्थतज्ञ, लेखक, शिक्षण तज्ञ, माजी राज्यसभा सदस्य, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व माजी मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई) व्याख्यान दु. १२.३० ते २ वसा वाचनसंस्कृतीचा सहभाग या विषयावर परिसंवाद ( सहभाग डॉ. नंदकिशोर मोतेवार विभाग प्रमुख, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई) श्री. किरण येले (साहित्यिक, मुंबई) श्री. अशोक मुळे (डिंपल प्रकाशन, मुंबई) डॉ. दीपक पाटील (वाचक व ग्रंथप्रेमी, मुंबई)
दु. २.३० ते ४ वाजता ओंकार साधना, मुंबई निर्मित “कुटुंब रंगले काव्यात” एकपात्री काव्यनाट्यानुभव (सादरकर्ते : श्री. विसुभाऊ बापट, मुंबई) दु. ४ ते ५ या वेळात सह्याद्री वाहिनी कार्यक्रम वृत्त निवेदिका दीपाली केळकर या “हास्यसंजीवनी” हास्य व विनोदाचे महत्त्व, साहित्यातील विनोदाचे विविध प्रकार, मान्यवरांचे किस्से, विडंबन, वात्रटिका, संत साहित्यातील विनोद यांनी सजलेला कार्यक्रम सादर करतील. सायं. ५-३० वाजता ग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधीक गौरव व ग्रंथोत्सव समारोप. या समारंभास एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबईच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे विभाग डॉ. सुभाष चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ