गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात २१ ते २५ फेब्रुवारी कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करावे – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, ‍‍दि. 16 : आदिवासी समाज बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसंदर्भात लाभार्थ्यांना  लाभ देण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करावे, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या.

मंत्रालयात मंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प कार्यालयातंर्गत लाभार्थी मेळाव्याच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री डॉ. गावित बोलत होते.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, केंद्र व राज्य शासनातर्फे आदिवासी समाजातील अनुसूचित जमाती वर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी लाभार्थ्यांना न्युक्लिअस बजेट योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शबरी घरकुल योजना या योजनांसह विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन तसेच पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ याठिकाणी देण्यात येणार आहेत.

21 फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी येथे 22 फेब्रुवारी, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी 23 फेब्रुवारी रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर 24 फेब्रुवारी, यवतमाळ जिल्ह्यातील राजुरा, वरोरा, झरीजामनी आणि 25 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, कळंब येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंत्री डॉ.गावित यांनी केले आहे.

या बैठकीस प्रकल्प अधिकारी गडचिरोली राहुल कुमार मीना, प्रकल्प अधिकारी भामरागड आदित्य जीवने, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव मच्छिंद्र शेळके तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *