मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

मुंबई, दि.१३: महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा पोलीस विभाग करीत आहेत. निर्भया प्रकल्पांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करून मुंबईत महिलांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी विविध बाबींवर आज मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

निर्भया योजनेंतर्गत मुंबई पोलिसांचे ‘श्वान पथक’ सक्षम करून गुन्हे सिद्धतेसाठी अधिकचे पुरावे मिळणार आहे. त्यामुळे महिला अत्याचार गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्यास मदत होईल.  वितरीत करण्यात आलेला निधीमधून या पथकाचे सक्षमीकरण होईल. यामधून श्वान पथकाची निश्चितच क्षमतावृद्धी होणार आहे.

रेल्वे पोलिसांना निर्भया प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या निधीचा उपयोग करून रेल्वे, लोकलमध्ये महिला सुरक्षेच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबई शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या निर्भया पथकातील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना ‘बॉडी वॉर्म कॅमेरे’ देण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सिद्ध करतेवेळी पुरावे गोळा करण्यासाठी  निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या अशा कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डींग उपयोगी ठरणार आहे.

त्याचप्रमाणे या प्रकल्पांतर्गत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमधील तपास कार्य जलद गतीने पूर्ण  करण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने संवदेनशील भागात फिरत्या गस्त वाहनांची संख्याही वाढविण्यात येईल. तसेच महिला सुरक्षेबाबत जनजागृती मोहीमही राबविण्याचे प्रस्तावित आहे. अशा विविध बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *