हातमाग विणकरांच्या पेन्शनसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार  – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मालेगाव, दि. १० (उमाका) : हातमाग विणकरांच्या व्यवसायाला चालना व या उद्योगाला उभारी देण्यासाठी हातमाग विणकरांना उत्सव योजनेचा लाभ वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर विणकरांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा शासनस्तरावर विचार सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहामध्ये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता धनादेश वाटप सोहळा मंत्री श्री. पाटील व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार किशोर दराडे, वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर,  प्रादेशिक उपायुक्त दिपक खांडेकर, वस्त्रनिर्माण निरीक्षक गजानान पात्रे, तांत्रिक सहाय्यक एस. बी. बर्मा यांच्यासह यंत्रमाग संघटनेचे पदाधिकारी, कामगार व नागरिक उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, देशात येवल्याच्या पैठणीचा नावलौकिक आहे. याचबरोबर शाल, पैठणी, घोंगडी या पारंपारिक व्यवसायात विणकर हे वर्षभर काम करतात. परंतु, त्यांना पाहिजे तसा मोबादला मिळत नाही. त्यामुळे उत्सव योजनेच्या माध्यमातून विणकरांचा व्यवसाय टिकण्यास मदत होईल व कुटूंबाला उदरनिर्वाह होण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने विणकरांना वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस लाभ देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या उत्कृष्ट वाणाला सन्मान मिळण्यासाठी शासनाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत विविध योजना जाहीर केल्या आहेत. या धोरणाच्या माध्यमातून विणकरांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देवून रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे. यासाठी आपले प्रयत्न असून ग्रा.पं.एरंडगाव खुर्द येथे गट नंबर २५ एकर जागा रेशीम पार्क करिता देण्यात आली आहे. त्यादृष्टीने सबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करावा. तसेच शासकीय रेशीम कोषाची खुली बाजारपेठ मंजूर झाल्याने तुतीच्या लागवडीस शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे, पारंपरिक विणकरांचे सर्वेक्षण करून त्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे नोंदणी करून ओळखपत्र देण्यात यावे. उत्सव योजनेचा लाभ देताना केंद्र सरकारकडे नोंदणी असणे बंधनकारक आहे. ही अट शिथिल करून राज्य शासनाकडे नोंदणी असलेल्या सर्वच विणकरांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, येवल्यात २००४ साली येवल्यात पैठणीची फक्त तीन दुकाने होती. आता सुमारे ४०० हून अधिक दुकाने सुरु आहेत. यातून पैठणी विणकरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विणकरांच्या कलेची दखल घेऊन ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हॅन्डलूम डे म्हणून घोषित केला आहे. अनेक लहान लहान घटकांना न्याय मिळावा यासाठी आपण राज्यात अनेक समाजासाठी महामंडळे स्थापन केली. विणकर समाजासाठी देखील महामंडळ स्थापन करण्याची राज्य सरकारची तयारी सुरु असून पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. येवल्यात शासकीय रेशीम कोष खुली बाजारपेठ निर्मितीस वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे.

रेशीम पार्क मुळे रेशीम उत्पादकांना कोष विक्रीसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे येवल्यातील रेशीम शेती आणि त्यावर आधारित पूरक उद्योगांचा विकास होईल. घरकुलाच्या अनेक योजना शासन राबवित आहे. त्यामुळे एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी पुढील एक वर्षात योजना राबवून घरकुल पूर्ण करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. येवला शहरात सध्या ३० गावांमध्ये साधारण ४ हजाराहून जास्त विणकर पैठणी हाताने विणतात. अनेक कुटुबांनी स्वतःच्या हातमाग व्यवसायाला मोठ्या उंचीवर नेले आहे. पैठणी उत्पादक भांडगे यांना तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. तर श्री. रमेशसिंग रामसिंग परदेशी यांना प्रधानमत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला हातमाग विणकरांना १५ हजार तर पुरुष विणकरांना १०  हजाराचे धनादेश वाटप करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *