‘लोकराज्य’मधील महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचालीचा मागोवा लवकरच एका क्लिकवर

नागपूर, दि. ८ : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयाम, त्या – त्या काळानुरुप लोककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धोरणे, राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा ‘लोकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला आहे. हा बहुमोल ऐतिहासिक दस्तऐवज आता डिजीटल स्वरुपात अंकनिहाय उपलब्ध होत असून लवकरच तो गुगल व इतर प्लॅटफॉर्मद्वारे वाचक व अभ्यासकांपर्यंत पोहोचवू, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ च्या दुर्मीळ अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर डिजीटल स्वरुपात उपलब्ध केलेल्या ५० दुर्मीळ अंकाचे लोकार्पण प्रधान सचिव सिंह यांच्या हस्ते झाले. विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास प्रभारी उपसचिव अजय भोसले, संचालक (माहिती) ( प्रशासन) किशोर गांगुर्डे, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील लोकप्रशासन, राज्यपातळीवर घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण देशात आकर्षण आहे. राज्यशास्त्र, इतिहास या ज्ञानशाखातील संशोधकांसाठी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकाद्वारे देण्यात आली. ही जडणघडण व यातील पाऊलखुणा असा मोठा दस्तऐवज आता जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध करुन देऊ असे प्रधान सचिव सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *