राष्ट्र कार्याच्या भावनेने काम करीत आयुष्मान भारत मिशन यशस्वी करावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

मुंबई, दि. ६ : प्रत्येक गरजू व गरीब रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. उपचारासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळे कुणीही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये. अशा नागरिकांना आयुष्मान भारत योजना संजीवनी आहे. या योजनेचे काम राष्ट्र कार्याच्या भावनेने करून मिशन यशस्वी करावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज दिल्या.

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री.शेटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे आयोजन करण्यात आले. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस आमदार सर्वश्री तमील सेलवन, कालिदास कोळंबकर, जिल्हाधिकारी संजय यादव, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस आमदार मनीषा चौधरी, आमदार श्रीमती भारती लव्हेकर, आमदार पराग आळवणी, राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी अजित गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, आदींसह मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी प्रत्येक वार्डात सीएससी केंद्राच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्याच्या सूचना देत श्री. शेटे म्हणाले की,  योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. नागरिकांना आपल्याला या योजनेचा लाभ कुठल्या रुग्णालयात मिळणार आहे, याची माहिती असावी.  प्रत्येक प्रभागात यादी ठळक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात  यावी.  गर्दीच्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी शिबिर लावावे. मुंबईत नागरिकांमध्ये  आयुष्मान भारत कार्ड विषयी जनजागृती करावी. त्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. जास्तीत जास्त कार्ड काढून प्रत्येकाला वार्षिक ५ लाख रुपयांच्या उपचाराचा लाभ द्यावा.

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयांची संख्या वाढविण्यात येणार आहे. याबाबतची कारवाई करण्यात येत आहे. मुंबईमध्ये संपूर्ण देशातून लोक उपचार करण्यासाठी येतात. त्यांना या योजनांचा लाभ मिळतो. मात्र मुंबईकर या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मुंबईकरांच्या रुग्ण सेवेसाठी या राष्ट्रकार्यात सर्व यंत्रणांनी आपला सहभाग द्यावा. नागरिकांनीसुद्धा स्वतः सक्रिय सहभाग घेत आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन डॉ. शेटे यांनी यावेळी केले.

या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये स्वस्त धान्य दुकान हा महत्त्वाचा घटक आहे.  पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून आयुष्मान भारत कार्ड काढण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांवरील आजारांवरील उपचारांमध्ये वाढ करायची आहे. या कार्यक्रमांतर्गतसुद्धा रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावी. लोकप्रतिनिधी यांनी योजनेची अंमलबजावणी, पॅनलवरील रुग्णालयांची संख्या, रुग्णांच्या तक्रारी याबाबत सूचना केल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शंभरकर यांनी यावेळी आयुष्मान भारत कार्ड संबंधित सूचना दिल्या. तसेच प्रत्येकाने स्वतः आयुष्मान भारत ॲप डाऊनलोड करून कार्ड काढण्याचे आवाहनही केले.

००००

निलेश तायडे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *