प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचे उद्या होणार उद्घाटन

मुंबई, दि. ३१ : पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रधान मंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील १०१ प्रशिक्षण केंद्रांचा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उद्या गुरुवार १ फेब्रुवारी २०२४ रोजी वर्षा निवासस्थान येथून शुभारंभ होणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये विविध १८ व्यवसायांच्या लाभार्थ्यांना ५ दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूलकिटसाठी १५ हजार रुपयांचे ई-व्हाऊचर मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना एक लाख रकमेचे ५ टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.पहिल्या हप्त्याच्या कर्जाची परतफेड नियमित असल्यास लाभाथ्यांना पुढील रू. दोन लाख रकमेचे ५ टक्के व्याजदराचे कर्ज मिळेल. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला वर्षा निवासस्थान  येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील १५ जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, विश्वकर्मा केंद्राचे संचालक तसेच स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *