राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

मुंबई, दि. २४ : अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व संस्था व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुष संचालक डॉ. रमण घुंगराळेकर उपस्थित होते.

आरोग्यसेवा देणाऱ्या सर्व यंत्रणांनी तत्परतेने पूरग्रस्त भागात सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, पूरग्रस्त भागात औषधांचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही आणि आवश्यक ती सर्व औषधे उपलब्ध असल्याबाबत खबरदारी घ्यावी. पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांचा विचार करून सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी. साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवाव्यात, असे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *