जुळे सोलापूर येथे नाट्यगृह उभारणीसाठी दहा कोटींचा निधी देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर दि. 27 (जिमाका) :-  सोलापूर ही कलावंतांची भूमी आहे. येथील कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जुळे सोलापूर येथे नाट्यगृहाची उभारणी करण्यात येणार असून महापालिका जागा उपलब्ध करून देत आहे. तर नाट्यगृहाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 10 कोटीचा निधी मंजूर केलेला असून यापेक्षा अधिक निधीची गरज भासल्यास सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

     शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मुख्य रंगमंचाचे पूजन व उद्घाटन(दि. 26) पालकंमत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  दीपप्रजव्लन करुन करण्यात आले.  यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संमेलन कार्यवाह विजयदादा साळुंके, प्राचार्य शिवाजीराव सावंत, संमेलन कार्याध्यक्ष प्रकाश युलगुलवार, समन्वयक कृष्णा हिरेमठ, रणजित गायकवाड, पी. पी. रोंगेसर, सहकार्यवाह विश्वनाथ आवड, तेजस्विनी कदम, नरेंद्र काटीकर,  दत्ताअण्णा सुरवसे, मोहन डांगरे, भारत जाधव, नाट्यरसिक, कलांवत आदि उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जुळे सोलापूर येथे नाट्यगृह उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. महापालिकेच्या वतीने नाट्य घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अत्यंत तातडीने होत आहे. हे नाट्यगृह लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध असल्याचे ही स्पष्ट केले. शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर येथे होत असल्याबद्दल आनंद आहे. संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आव्हान त्यांनी केले. यावेळी प्रकाश युलगुलवार व प्राचार्य शिवाजीराव सांवंत यांनी मनोगत व्यक्त केले.

       नाट्य संमेलनाचे प्रास्ताविक विजयदादा साळुंके यांनी केले. नाट्य संमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. हे नाट्य संमेलन सोलापूर येथील कलावंतासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तरी कलावंतांनी त्याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे व  अमृत ढगे यांनी केले तर आभार तेजस्विनी कदम यांनी मानले.

               00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *