मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी २०१८ मध्ये स्थापन झालेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेने (सारथी) विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ या ब्रीदवाक्यासह कार्यरत असलेली ही संस्था विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी खरी ‘सारथी’ ठरली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग, कर्मचारी निवड आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देऊन ‘सारथी’ने विद्यार्थ्यांचा यशाचा मार्ग सुकर केला आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी सर्वंकष मार्गदर्शन
‘सारथी’ने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्वंकष उपाययोजना राबवल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी नवी दिल्ली आणि पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये एक हजार विद्यार्थ्यांना ११ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क ‘सारथी’द्वारे दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आर्थिक बोजा कमी होतो. याशिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी १८ हजार रुपये, प्रवास खर्चासाठी १० हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १३ हजार रुपये विद्यावेतन मिळते. तसेच सारथी मार्फत अभिरूप मुलाखतींद्वारे विद्यार्थ्यांची अधिकची तयारी करून घेतली जाते. याचा परिणाम म्हणून, २०२४ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात १७ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली, तर आतापर्यंत १२८ विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा आणि वन सेवा यांसारख्या परीक्षांसाठीही ‘सारथी’ प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य पुरवते. प्रशिक्षण शुल्क, मासिक विद्यावेतन आणि आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जातो. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थ्यांना एकरकमी सहाय्य मिळते. यामुळे आतापर्यंत १ हजार ४९ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवून शासन सेवेत रुजू झाले आहेत.
बँकिंग आणि इतर परीक्षांसाठी सहाय्य
‘सारथी’ केवळ केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगापुरते मर्यादित नसून बँकिंग, कर्मचारी निवड आयोग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि राज्य पात्रता परीक्षा यांसारख्या इतर स्पर्धा परीक्षांसाठीही प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य पुरवते. या परीक्षांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी शुल्क आणि मासिक विद्यावेतन दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे न जाता तयारीवर लक्ष केंद्रित करता येते.
प्रशिक्षणाची प्रभावी व्यवस्था
‘सारथी’चे मुख्य कार्यालय पुणे येथे असून, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई (खारघर, नवी मुंबई) आणि लातूर येथे विभागीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली ही संस्था विद्यार्थ्यांना केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक आणि शैक्षणिक आधार देणारी ठरली आहे. प्रशिक्षणासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन, अद्ययावत अभ्याससाहित्य आणि तज्ज्ञ शिक्षकांचे सहकार्य मिळते.
यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास
‘सारथी’च्या या सर्वंकष प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने साकार केली आहेत. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ‘सारथी’च्या योजनांमुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक संसाधने आणि आत्मविश्वास मिळाला आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध झाल्या आहेत.
‘सारथी’ने केवळ स्पर्धा परीक्षांपुरते योगदान दिलेले नाही, तर समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट ‘सारथी’ने यशस्वीपणे साध्य केले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना सारथीच्या संकेतस्थळावरून माहिती मिळवून अर्ज करण्याचे आवाहन लातूर येथील विभागीय कार्यालयाच्या उप व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अहिल्या गाठाळ यांनी केले आहे.
‘सारथी’ ही संस्था खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा ‘सारथी’ बनली आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक आर्थिक, शैक्षणिक आणि मानसिक आधार देऊन ती विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवत आहे. ‘सारथी’च्या या प्रयत्नांमुळे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा यशाचा मार्ग सुकर झाला आहे, आणि भविष्यातही हा प्रवास अधिक गतिमान होईल, यात शंका नाही.
-तानाजी घोलप,
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, लातूर