प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा

मुंबई, दि. २३ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज निर्गमित केले.

या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय, अर्धशासकीय समारंभ आयोजित करून नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल, त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजेच्यापूर्वी किंवा सकाळी १० वाजेनंतर करावा.

मुंबई येथील शिवाजी पार्क, दादर येथे राज्यपाल रमेश बैस हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पुढील प्रमाणे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, मंत्री ध्वजारोहण करतील (अनुक्रमे मा. पालकमंत्री, मा. मंत्री यांचे नाव आणि ध्वजारोहण करण्यात येणाऱ्या जिल्ह्याचे नाव या क्रमाने). देवेंद्र फडणवीस- नागपूर, अजित पवार- पुणे, राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, दिलीपराव वळसे पाटील- बुलढाणा, डॉ. विजयकुमार गावित- भंडारा, हसन मुश्रीफ- कोल्हापूर, अब्दुल सत्तार- हिंगोली, चंद्रकांत पाटील- सोलापूर, गिरीश महाजन- धुळे, सुरेश खाडे- सांगली, तानाजी सावंत- धाराशीव, उदय सामंत- रत्नागिरी, दादाजी भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, गुलाबराव पाटील- जळगाव, संदिपान भुमरे- छत्रपती संभाजीनगर, धनंजय मुंडे- बीड, रवींद्र चव्हाण- सिंधुदुर्ग, अतुल सावे- जालना, शंभूराज देसाई- सातारा, मंगल प्रभात लोढा- मुंबई उपनगर, धर्मरावबाबा आत्राम- गोंदिया, संजय बनसोडे- लातूर, अनिल पाटील- नंदुरबार, दीपक केसरकर- ठाणे, आदिती तटकरे- रायगड.

इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, तथापि, राष्ट्रध्वजारोहण करणारे मा. मंत्री  अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिका-यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. राज्यात या दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारावेत.  राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक दि. ५ डिसेंबर, १९९१, ११ मार्च, १९९८ रोजी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालनाची दक्षता घ्यावी. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा.

दिवसभरातून वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालयस्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात.             सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर मोहीम राबवावी.  काही ठराविक जिल्ह्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात पुढीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात, त्यात ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये. कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये. मा. पालकमंत्री हे भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व, बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा तसेच देशाचा गौरव यापुरतेच मर्यादित असावे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *