मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटली हे स्वच्छता मोहिमेचे यश; संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 21 – मुंबई शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून संपूर्ण स्वच्छता मोहीमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण स्वच्छता मोहीमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहीमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी 350 वरून 100 ते 80 पर्यंत खाली आली आहे. हे या संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत आज कुर्ला परिसरातील शिवसृष्टी येथील श्री गणेश मंदिर, श्री. नंदिकेश्वर मंदिर, श्री हेरंब मंदिर, सिद्धेश्वर सहकारी गृह निर्माण संस्था, श्री शनैश्वर मंदिर, चेंबुर येथे सपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार तुकाराम काते, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (परिमंडळ – 5) हर्षद काळे, उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरे, सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, अलका ससाणे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक जन चळवळ झाली आहे. टप्प्या टप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहीमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या आयोध्या येथील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान श्री. मोदी यांनी केले आहे. त्याला देशातील सर्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहीमेला गती मिळाली आहे. मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज कुर्ला येथील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहीमेचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारी आहेत. दिवस रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचेही सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिप क्लिन ड्राईव्ह ही मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेच्या माध्यमातून सिडको, एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहीमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, सफाई कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणांसह नागरिक उर्त्फूतपणे प्रतिसाद देत आहेत.

यावेळी परिसरातील नगरिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, मंदिरांचे विश्वस्त, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहीमेदरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी, परिसरातील नागरिक आणि भाविक यांच्याशी संवाद साधला.

दरम्यान, कुर्ला पूर्व भागात स्वच्छता मोहीम आटोपून परतत असताना रस्त्याच्या कडेला जाणारी दोन लहान मुले मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिसली. या मुलांच्या हातात गदा होती. रस्त्याने आपल्या आईसोबत चालत जाणारी ही गदाधारी मुले पाहून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवला. स्वतः त्या लहान मुलांना जवळ बोलावले. त्या लहानग्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या आपुलकीच्या वागणुकीने ही लहान मुले भारावून गेल्याचे यावेळी दिसले.

मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन मागे घ्यावे, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आवाहन

मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणला कोणताही धक्का लागणार नाही. शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *