वर्सोवा खाडी येथील मासेमारी बंदराच्या कामाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १७ : वर्सोवा खाडी येथील प्रस्तावित मासेमारी बंदराच्या कामास गती देऊन लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

वर्सोवा व सातपाटी बंदरांसंबंधात व अलिबाग येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले की, वर्सोवा खाडी परिसरातील मच्छीमारांची उपजीविका मोठ्या प्रमाणावर मासेमारीवर अवलंबून आहे. त्यामुळे वर्सोवा खाडी येथील प्रस्तावित मासेमारी बंदराच्या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेऊन कामकाजाला सुरुवात करावी.

मंत्री राणे यांनी अलिबाग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाचा आढावा घेतला. या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन बांधकामाची पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी तालुक्यातील मत्स्य बंदराचा विकास याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

०००

मोहिनी राणे/ससं/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *