पालिका शाळांनी विद्यार्थ्यांना परकीय भाषा देखील शिकवाव्यात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १७: लहान मुले तंत्रज्ञानस्नेही असतात तसेच ते नवनवीन भाषा देखील लवकर शिकतात. बृहन्मुंबई महानगर पालिका देशातील आर्थिकदृष्ट्या संपन्न महानगरपालिका असून पालिकेने आपल्या शाळा संपूर्ण देशासाठी पथदर्शक म्हणून विकसित कराव्यात तसेच विद्यार्थ्यांना जर्मन, जपानी यांसारख्या विदेशी भाषा देखील शिकवाव्यात, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या नव्या शैक्षणिक सत्राच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव स्वागत समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या वरळी मुंबई येथील शैक्षणिक परिसरात झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिका ११०० शाळा चालवीत असून ३.५० लाख विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य व भोजन मोफत देत असल्याबद्दल पालिकेचे अभिनंदन करताना शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय कौशल्य विकास व खेळासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबईत खेळांची मैदाने कमी असल्यामुळे शाळांना रोटेशन पद्धतीने मैदाने उपलब्ध करून द्यावीत असे राज्यपालांनी सांगितले.

फिनलँड देशाच्या शिक्षण पद्धतीचे कौतुक केले जाते असे नमूद करून पालिकेने आपल्या काही शिक्षकांना तेथील शिक्षणपद्धती समजून घेण्यासाठी पाठवावे असे राज्यपालांनी सांगितले. गरिबीतुन लोकांना बाहेर काढण्यासाठी शिक्षण ही एकच किल्ली असल्याचे नमूद करून पालिकेतील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल ९३ टक्के लागल्याबद्दल राज्यपालांनी सर्वांचे अभिनंदन केले.

शाळेत पोषण आहार देताना ज्या विद्यार्थ्यांना अंडी खाणे चालत असेल अशा विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी देण्याबाबत देखील पालिकेने प्रायोगिक तत्वावर सुरुवात करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.

यावेळी राज्यपालांनी प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक साहित्य व चॉकोलेट्सचे वाटप केले. राज्यपालांनी वर्गखोल्यांची पाहणी केली तसेच खगोलशास्त्र प्रयोगशाळेला भेट दिली. पालिकेच्या शाळेतून ९७ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनीचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी मुंबई महानगरपालिका कन्नड, तमिळ, मराठी, हिंदी, उर्दू आदी आठ माध्यमांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून राज्य परीक्षा मंडळासह, सीबीएसई, आयसीएसई, आयबी आदी मंडळांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.  मुंबई महानगरपालिकेचे शैक्षणिक बजेट ४००० कोटी रुपयांचे असून पालिका विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य मोफत देत असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, महानगरपालिका उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *