‘एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 15 : उद्योग विभाग ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी अर्थात एव्हीजीसी – एक्सआर धोरण आणत आहे. यामध्ये ॲनिमेशन, गेमिंगचे नवनवीन सॉफ्टवेअर निर्मिती, वेब सीरिज आदींचा समावेश असणार आहे. मुंबईत बॉलिवूड असल्याने चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. यासोबतच मराठी चित्रपट निर्मितीही राज्यात होते. या धोरणात मराठी चित्रपट निर्मितीबाबत स्वतंत्र कॅटेगिरी करून समावेश करण्यात यावा, अशा सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

मंत्रालयात या प्रस्तावित धोरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले, हे धोरण सर्वंकष असावे. धोरणातून या क्षेत्रातील घटकांना सवलती देण्याबाबत दुरदृष्टीकोन ठेवण्यात यावा. राज्यात सातारा जिल्ह्यातील वाई आणि परीसरात मराठी चित्रपटांचे चित्रिकरणाचे ‘हब’ बनत आहे. तसेच भोजपुरी चित्रपटांचे चित्रीकरणही राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अशा बाबींचा समावेशही या धोरणात असावा.

वेब सिरीजमध्ये काही स्वतंत्र विषय घेऊन केलेल्या असतात. त्यामध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण आदींचा समावेश असतो. अशा स्वतंत्र विषयाला वाहिलेल्या वेब सिरीज निर्मितीचा विषयवार या धोरणात सहभाग असावा, अशा सूचनाही मंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.

000

निलेश तायडे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *