पालघर येथे ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा देणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ०९: पालघर जिल्ह्यातील मौजे कुंभवती येथे १५० खाटांचे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे. हे रुग्णालय ही या परिसरातील रुग्णांसाठी अत्यावश्यक बाब असून यासाठी एक रुपये भाडेतत्वावर शासकीय जागा उपलबध करुन देण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मौजे कुंभवती येथील सर्व्हे क्रमांक 1775/57 ही जमीन 150 खाटांचे ईएसआयसी रुग्णालय बांधण्यासाठी नाममात्र शुल्कात मिळण्याबाबत मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस खासदार हेमंत सवरा, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, पालघर परिसरात ईएसआयसी रुग्णालय अत्यावश्यक असल्याने सदर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने शासनाकडे सादर करावा. एक रुपये भाडेतत्त्वावर जागा देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *