‘अभिजात मराठी’साठी लवकरच समिती गठित करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ०१: मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून आता भाषेच्या संशोधन आणि विकासासाठी तसेच भाषेच्या उन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक विभागास १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांची उद्दिष्टे दिली, त्या अनुषंगाने मराठी भाषा मंत्री सामंत यांच्या अध्यकतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस मराठी भाषा विभागाचे सहसचिव दादासाहेब भोसले तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, मराठी पुस्तकांना पुरस्कार देण्यात येतो. वाचक हा पुस्तक खरेदी करताना प्रथम पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून पुस्तक घेतो. त्यामुळे मराठी पुस्तकांच्या उत्तम मुखपृष्ठासाठी पुरस्कार देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मंत्री सामंत म्हणाले की, मराठी भाषा विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे नूतनीकरण करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन उभारण्याचे काम सुरू आहे. सीमा भागात असलेल्या गावामध्ये मराठी भाषेच्या प्रसारासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *