मराठी भाषेसाठी अपरांतभूमीचे योगदान..

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील साहित्यिक वाटचाल यावर विशेष लेख…

सावंतवाडीचे कवी वसंत सावंत यांनी आपल्या कवितेत म्हंटलय अशा लाल मातीत जन्मास आलो । जिचा रंग रक्तास दे चेतना।।

कोकणची ही माती खरोखरच चैतन्यदायी आहे. इथल्या कवी, लेखक, इतिहास संशोधक संशोधक, समाजसुधारक, शास्त्रज्ञ यांनी भरतभूमीला आपल्या कर्तृत्वाने विविध आभूषणे अर्पण केली.

नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. अर्थात ही भाषा अभिजात होण्यासाठी या अपरांत भूमीतील अनेक साहित्यिकांनी विविध अलंकार घातले.

भारतावर इंग्रजी अंमल बसू लागला होता. पाश्चात्य देशाची दारे खुली व्हायला लागली होती. अशावेळी समाजातली गतानुगतिकता संपून नवविचारांना सामोरा जाण्यासाठी प्रबोधनाचे माध्यम म्हणून वृत्तपत्राची गरज आहे हे जाणून कोकणातील एक महापुरुष पुढे आला. ते होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. इ.स.१८३२ मध्ये त्यांनी ‘दर्पण ‘ साप्ताहिक सुरू केले. बाळशास्त्रींचा जन्म देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावचा. त्यांनी साप्ताहिक दर्पणमधून स्त्रियांना शिक्षण, विधवा विवाह अशा अनेक समस्यांवर जनमानसात जागृती करण्यासाठी प्रयत्न केला. रुढींची बेडी तोडल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून आपल्या ‘शतपत्रांमधून रूढीग्रस्तांवर चाबूक उगारणारे लोकहितवादी रत्नागिरी जिल्ह्यातील पावसचे तर त्यांची शतपत्रे तितक्याच निर्भयतेने प्रसिद्ध करणारे भाऊ महाजन हे रायगड जिल्ह्यातील पेण गावी जन्मले. १८४१ साली त्यांनी ‘प्रभाकर’ साप्ताहिक सुरू केले.

रत्नागिरी जिल्ह्यात पहिले वृत्तपत्र सुरू केले ते जनार्दन हरी आठल्ये यांनी. ‘जगन्मित्र ‘ साप्ताहिक म्हणजे त्याकाळी रत्नागिरी गँझेट म्हटले जायचे. मराठी भाषेच्या वृत्तपत्रीय योगदानात कोकणभूमी अग्रेसर होती.

जागतिक पातळीवर आपल्या संशोधनाला मान्यता मिळाली पाहिजे यासाठी संशोधन आंग्ल भाषेत प्रसिद्ध करायला हवे. मात्र मला माझे संशोधन माझ्या मराठी बांधवांना कळायला हवे म्हणून मी मराठी भाषेतच लिहीन हा विचार करून इतिहास संशोधकाचे अवाढव्य काम केले इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी. इतिहासाचार्य मूळचे देवरुखचे. पुढे त्यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यात वरसईला गेले. त्यांच्या प्रमाणे वासुदेवशास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई, वा.वि. मिराशी, दत्तो वामन पोतदार अशा अनेक कोकणातील  संशोधकांनी आपल्या संशोधनाने आणि लेखनाने मराठी भाषा समृध्द केली. इतिहासाइतकेच खगोलशास्त्रालाही कोकणभूमीने महत्त्वाचे योगदान दिले

स्वातंत्र्य आंदोलनातला धगधगता अंगार म्हणजे लोकमान्य टिळक ! लोकमान्यांनी खगोलशास्त्रातही फार मोठे कार्य केले. त्यांचा ‘आर्यांचे मूलस्थान’ हा खगोलशास्त्रावर आधारित ग्रंथ जगभर गाजला. दापोली तालुक्यातील मुरुड गावी जन्मलेल्या शं. बा. दीक्षितांनी १८९६ साली ‘भारतीय ज्योतिःशास्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास हा संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केला इतिहास संशोधक फ्लिटने म्हंटलय गुप्त साम्राज्याचा काळ शोधण्यासाठी मला शं. बा. दीक्षितांचा उपयोग झाला.  मराठी भाषा समृद्ध होण्यात मोठा वाटा आहे तो प्रादेशिक बोलींचा. महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. आपल्या कोकणातही मालवणी, दालदी, कातोडी, सामवेदी, चित्पावनी, तिल्लोरी कुणबी अशा अनेक बोलींनी मराठी भाषेचा गंगौघ समृद्ध केला आहे. आचार्य विनोबाजींनी गीता मराठी भाषेत आणली तर, वालावलचे अर्जुन बळवंत वालावलकर यांनी गीतेचे मालवणी बोलीत रुपांतर केले. चिपळूणचे नामवंत कवी आणि लेखक वि. ल. बरवे यांनी आपल्या ‘मुचकुंददरी’ कादंबरीत कुणबी बोलीचा वापर केला. अरुण इंगवले यांनी कुणबी बोलीतील दहा हजारहून अधिक शब्द वाक्प्रचार यांच्या कोशाचे काम केले आहे. ह. मो. मराठे यांच्या ‘बालकांड’ आत्मचरित्रात आपल्याला चित्पावनी बोलीचे दर्शन घडते. जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे यांच्या कथा कादंबरीत अस्सल कोकणी भाषेचा झणझणीत अनुभव येतो. गंगाराम गवाणकरांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकातून मालवणीचा मासला कळतो . आधुनिक मराठी कवितेचे प्रणेते केशवसुत असोत वा चरित्र लेखनाचा मानदंड निर्माण करणारे धनंजय कीर अशा अनंत अपरांतपुत्रांनी अभिजात भाषे भरभरून योगदान दिले आहे.

०००

प्रकाश देशपांडे, चिपळूण

The post मराठी भाषेसाठी अपरांतभूमीचे योगदान.. first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *