सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देणार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

सातारा, दि. २९: सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्यात येईल. तसेच प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिली.

पुसेगाव येथे आयोजित श्री सेवागिरी महाराज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री श्री.भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तहसीलदार बाई माने, डॉ. प्रिया शिंदे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन सुरेश जाधव यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त  उपस्थित होते.

पुसेगाव येथील गर्दी पाहता अंतर्गत रस्ता बाह्य रिंग रोड तयार करून वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यात येईल, असे सांगून मंत्री श्री. भोसले म्हणाले की, या रस्त्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळावे. स्थानिकांचे सहकार्य लाभल्यास कामे गतीने होतात. उरमोडी धरण हे सातारा तालुक्यात आहे. त्याचे पाणी आज दुष्काळी माण-खटाव तालुक्यात जात आहे, यामुळे येथील ऊस शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

माण, खटाव व कोरेगाव तालुक्याला बारमाही पाणी मिळण्यासाठी सोळशी येथे धरण बांधण्यात येत आहे. या धरणातील पाणी जावली तालुक्यालाही मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन या धरणासाठी सहकार्य केले जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच पुसेगाव गावासाठी ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या दिल्या जातील असेही मंत्री श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळी तालुके येत्या पाच वर्षात दुष्काळमुक्त करणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

यावेळी ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले की, मला ग्रामविकास पंचायत राज विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना बारमाही पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करुन तालुके येत्या 5 वर्षात दुष्काळमुक्त करणार आहे. सोळशी धरणाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. हे धरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातून दुष्काळी तालुक्यांना बारमाही पाणी मिळेल असेही त्यांनी सांगितले.

श्री सेवागिरी देवस्थानच्या माध्यमातून दरवर्षी कृषी प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबर अत्याधुनिक कृषी औजारांची माहिती होण्याबरोबर आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. श्री सेवागिरी देवस्थाने ज्या ज्या मागण्या मांडल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला जाईल, असेही मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु आहे. पुसेगाव यात्रेमध्ये प्रशासनाने पहिल्यादांच आरोग्यदायी यात्रा हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा,असे आवाहन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कराचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

The post सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देणार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *