ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळाची निर्मिती
नागपूर, दि. १६: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमुख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनाने अनुभवला आहे. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते अनुशेषापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा हिवाळी अधिवेशनात झाल्या आहेत. याचा आढावा घेणारा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ साकारावा असा मानस आहे. येथील तिन्ही पिढ्यांचा सहभाग असलेले सशक्त संपादक मंडळ या ग्रंथाची दिलेल्या मुदतीत अभ्यासपूर्ण निर्मिती करेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
Virendra Dhuri DGIPR,Mantralaya
येथील विधानभवनात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक यांची विशेष बैठक उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रीत केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील राष्ट्रकुल समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस विधानभवनचे सचिव 2 (कार्यभार) विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, नागपूर विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, माजी संपादक सुधीर पाठक, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्रा, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, पुण्य नगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, आनंद निर्वाण, विश्वास इंदुलकर, शैलेश पांडे, महेश उपदेव, रवी गुळकरी, विकास वैद्य, वैभव गांजापुरे व इतर सन्माननिय पत्रकार उपस्थित होते. या संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांनी आपले योगदान देण्याचे सहर्ष मान्य केले.
Virendra Dhuri DGIPR,Mantralaya
‘नागपूर येथील हिवाळी अधिवेशने – विधानपरिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा’ या ग्रंथाच्या परिपूर्ण निर्मितीसाठी संपादकीय मंडळ निश्चित करण्याचा सर्वांच्या वतीने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. यात प्रदीप मैत्र, कार्याध्यक्ष, श्रीपाद अपराजित, श्रीमंत माने, गजानन निमदेव, रमेश कुलकर्णी, शैलेश पांडे, भुपेंद्र गणवीर, महेश उपदेव, प्रभाकर धुपारे, मनिष सोनी, आनंद निर्वाण, विकास वैद्य आणि नागपूर – अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे. समन्वय संपादक निलेश मदाने यांचा समावेश आहे. आवश्यक तो विस्तार यात चर्चेनुसार केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले.
या प्रस्तावित ग्रंथासंदर्भात चर्चा करताना यातील मजकूर हा संशोधन व संदर्भाच्या दृष्टीने पूरक असावा असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. विशेषतः हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करताना पत्रकारांनी जे अनुभवले ते यात प्रतिबिंबित झाल्यास त्यातील वाचनियता वाढेल यावर सर्वांचे एकमत झाले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार व संपादक यांना ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या प्रती देऊन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
०००
हेमंतकुमार चव्हाण/ससं/