कांदिवली येथे राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव 

मुंबई, दि. १२ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे बुधवारी सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. ‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. भगवद्गीता आपल्याला जगणे शिकविते, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी केले.

पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भगवद्गीता शिक्षा अभियान समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे, जुहू इस्कॉनचे अध्यक्ष श्री. ब्रज हरी दास, पोईसर जिमखानाचे अध्यक्ष मुकेश भंडारी, अमेरिकेच्या टेक्सासचे अटॉर्नी जनरल कॅन टॅक्सन आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, भगवद्गीता हा भारतातील ज्ञान आणि बुद्धीचा उत्कृष्ट ग्रंथ आहे. प्रत्येकाने स्वच्छ मनाने आणि फळाची चिंता न करता एकाग्रतेने आपले कर्तव्य करत रहावे, यशाच्या रूपाने फळ आपोआप मिळेल, असे गीता शिकविते.

समाजातील प्रत्येकाला शिक्षण, आरोग्य, निवास आदी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेने गरजूंना या किमान सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेऊन इतर देशांसमोर आदर्श निर्माण करावा, आपणही यासाठी सहकार्य करू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जगातील सर्व प्रगत देशांनी यासाठी प्रयत्न केल्यास चांगली समाज निर्मिती होऊन मानवाचा हॅपिनेस इंडेक्स वाढेल, असा विश्वास राज्यपाल श्री. राधाकृष्णन यावेळी व्यक्त केला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *