जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींची संस्मरणीय भेट

जळगाव, दि. 12 (जिमाका)- जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो) योजनेतून शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा याकरीता टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावल व दैनिक पुढारी यांच्यावतीने दिल्ली दर्शन व महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट घडवून देण्यात आली.

यामध्ये यावल प्रकल्पात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वैजापूर येथील सोनिया बारेला, शासकीय आश्रम शाळा लालमाती शाळेतील शितल बारेला, शासकीय आश्रम शाळा गंगापुरी शाळेतील सुरेश बारेला, शासकीय आश्रम शाळा सार्वेतील श्याम पावरा तसेच विद्यार्थ्यांसमवेत पालक अधिकारी म्हणून वैजापूरच्या अधिक्षिका कुमारी श्वेंता टेंभुर्णी यांचा समावेश हाेता.
सर्व विद्यार्थ्यांनी आग्रा येथे ताजमहाल दर्शन व दिल्ली गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, मा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांची भेट व राजघाट येथिल महात्मा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालय इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. राष्ट्रपती भावनात जाऊन महामहीम मा. राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत महामहीम मा. राष्टपतींशी चर्चा केली.

सदर दौरा हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केली व दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून अशा भेटींची संधी प्रत्येकाने मिळवावी यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा या करीता शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *