सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक; जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

मुंबई, दि. ९ : सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक असून जनतेच्या आशा आकांक्षा व्यक्त करणारे हे सभागृह आहे. सभागृहाच्या वेळेचा  राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी उपयोग करून, जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचे  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले.

विधानसभेत 15 व्या विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबदल सर्वांचे आभार मानत श्री. नार्वेकर म्हणाले, सदस्यांनी सभागृहात असताना समाजाच्या विकासाचा आणि समाजात वावरत असताना सभागृहाचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. सभागृहाचे कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी चतुसूत्री कार्यक्रम राबविण्यात येईल. सभागृहात सदस्यांना आपापल्या विधानसभा मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्व आहे. समिती पद्धती हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे, तर कायदा निर्मिती हे विधानमंडळाचे अंगीभूत महत्वाचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कल्याणकारी संकल्पनेची प्रभावी अभिव्यक्ती आहे. सदस्यांना अर्थसंकल्पावरील चर्चा करण्यासाठी पुरेसा अवधी देऊन, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानी कार्य करून  विधिमंडळ कामकाज करत असताना दोन्ही बाजूंचे सहकार्य आवश्यक असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

The post सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक; जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *