मुंबई, दि. ६: ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
The post मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस first appeared on महासंवाद.