मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई
ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी १४ टेबल
टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठीही एकूण ३६ टेबल
मुंबई दि. २२: मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दहा वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.
मतदान केंद्रांवरील आवश्यक त्या सोयीसुविधा व उपाययोजनांबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहणी करुन सातत्याने आढावा घेत आहेत.
मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून धारावी विधानसभा मतदारसंघासाठी सत्यप्रकाश टी.एल. (भा.प्र.से.), सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी केदार नाईक, वडाळा विधानसभा मतदारसंघासाठी विक्रम सिंह मलिक, माहिम विधानसभा मतदारसंघासाठी हिमांशु गुप्ता, वरळी विधानसभा मतदारसंघासाठी समीर वर्मा, शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी के. सी. सुरेंदर, भायखळा विधानसभा मतदारसंघासाठी अंजना एम., मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी रवींद्र नाथ गुप्ता, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघासाठी शिल्पा शिंदे, कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी मोहम्मद रेहान रझा यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी वडाळा, माहिम आणि वरळी विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०५ टेबल, भायखळा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०४, धारावी, शिवडी आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०३ टेबल तर सायन कोळीवाडा आणि मुंबादेवी मतदारसंघासाठी प्रत्येकी ०२ असे एकूण ३६ टेबल असतील. सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक असे एकूण १० टेबल असतील. सकाळी ०८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या
धारावी विधानसभा मतदारसंघ – १९ मतमोजणी फेऱ्या, सायन-कोळीवाडा – २०, वडाळा -१६, माहीम – १८, वरळी – १७, शिवडी – १९, भायखळा – १९, मलबार हिल – २०, मुंबादेवी – १७, कुलाबा – १९ अशा मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.
सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठित करण्यात आली आहेत.
प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू
जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहेत.
मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकारपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मीडिया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मीडिया सेंटर येथे जमा करावा लागेल.
मतदार संघ व मतमोजणी केंद्र
धारावी – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, तळमजला, किचन रूम, धारावी बस आगाराच्या जवळ, सायन वांद्रे लिंक रोड, धारावी, मुंबई – ४०००१७.
सायन कोळीवाडा – न्यू सायन मुन्सिपल स्कूल, प्लॉट नंबर 160/ 161, स्कीम सहा, रोड नंबर 28, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल जवळ, सायन पश्चिम, मुंबई-४०००२२.
वडाळा – बीएमसी नवीन इमारत, सीएस नंबर ३५५ बी, स्वामी वाल्मिकी चौक, हनुमान मंदिरासमोर, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल, मुंबई-३७
माहीम – डॉक्टर अँटनिओ डी’साल्व्हिया हायस्कूल, एमरोल्ड हॉल, दादर, मुंबई-28.
वरळी – पश्चिम रेल्वे जिमखाना हॉल, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी क्रीडा मैदान
शिवडी – ना. म. जोशी मार्ग, बीएमसी प्राथमिक शाळा क्रमांक दोन, लोअर परळ, मोनो रेल स्टेशन जवळ, ना.म. जोशी मार्ग, करी रोड, मुंबई-११.
भायखळा – रिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेड, तळमजला हॉल, जे जे रोड, ह्युम हायस्कूल जवळ, भायखळा, मुंबई-०८
मलबार हिल – विल्सन कॉलेज, तळमजला, रूम नंबर १०२, १०४, नेताजी सुभाष चंद्र मार्ग, गिरगाव चौपाटी, चर्नी रोड, मुंबई-०७.
मुंबादेवी – तळमजला, गिल्डर लेन, बीएमसी शाळा, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन समोर, मुंबई सेंट्रल पूर्व, मुंबई-०८.
कुलाबा – न्यू अप्लाइड आर्ट असेंबली हॉल (एक्झिबिशन हॉल), जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई –
०००
शैलजा पाटील/विसंअ/
The post विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज first appeared on महासंवाद.