लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.
मतदार नोंदणीत वाढ; राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९, तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत, ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार
राज्यात 4,69,96,279 महिला मतदार आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग (PwDVoters) मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची संख्या 1,16,170 आहे.
राज्यात एकूण 4136 उमेदवार
राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण ४ हजार १३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१ पुरूष, ३६३ महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मतदानासाठी 2,21,600 बॅलेट युनिट
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदान केंद्रांसाठी 2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट व 5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण 185 विधानसभा मतदाररसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर 100 मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र सज्ज
विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.
महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र राहणार आहेत. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात मतदान केंद्रे
मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात एकूण मतदान केंद्रे 1,00,186 आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42,604 तर ग्रामीण मतदान केंद्र 57,582 इतकी आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.
आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष
यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
मतदान केंद्रांची संख्या – जिल्हानिहाय
1.
पुणे – 8462
2.
मुंबई उपनगर – 7579
3.
ठाणे – 6955
4.
नाशिक – 4922
5.
नागपूर – 4631
6.
अहमदनगर – 3765
7.
सोलापूर – 3738
8.
जळगाव – 3683
9.
कोल्हापूर – 3452
10.
औरंगाबाद – 3273
11.
सातारा – 3165
12.
नांदेड – 3088
13.
रायगड – 2820
14.
अमरावती – 2708
15.
यवतमाळ – 2578
16.
मुंबई शहर – 2538
17.
सांगली – 2482
18.
बीड – 2416
19.
बुलढाणा – 2288
20.
पालघर – 2278
21.
लातूर – 2143
22.
चंद्रपूर – 2077
23.
अकोला – 1741
24.
रत्नागिरी – 1747
25.
जालना – 1755
26.
धुळे – 1753
27.
परभणी – 1623
28.
उस्मानाबाद – 1523
29.
नंदूरबार – 1434
30.
वर्धा – 1342
31.
गोंदिया – 1285
32.
भंडारा – 1167
33.
वाशिम – 1100
34.
हिंगोली – 1023
35.
गडचिरोली – 972
36.
सिंधुदुर्ग – 921
विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिकशाईच्या बाटल्यांची तरतूद
विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.
४२६ मतदान केंद्र ‘महिला नियंत्रित’
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.
महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेतली आहे.
जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५, जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४, उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७, ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.
घरबसल्या जाणून घ्या आपल्या मतदान केंद्राची माहिती
मतदारांना सहजतेने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,यादृष्टीने निवडणूक यंत्रणेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच वोटर्स ॲपवर मतदारांना आपला निवडणूक ओळखपत्राचा अंक टाकून किंवा स्वतःचे नाव किंवा मतदार नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे या ॲपवर आपले नाव मतदार यादीत शोधणे तसेच मतदान केंद्र याची माहिती सहजतेने मिळू शकते. मतदानासाठी जाताना ॲपच्या सहाय्याने मतदारांनी आपले मतदान केंद्र, आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा केल्याने कमी वेळेत मतदान करणे सहजतेने शक्य आहे.
१९५० क्रमांकाची हेल्पलाइन
निवडणुकविषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर १९५० या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
सक्षम ॲप
भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.
सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.
गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp
ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568
मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, मतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमी, डमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
मतदान केंद्रावर हे पुरावे असणार ग्राह्य
आपले नाव मतदार यादीत असेल मात्र मतदान केंद्रावर निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेले मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान केंद्रावार त्याच्याशिवाय पुढील ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामध्ये १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) भारतीय पारपत्र ५) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ६) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मूळ प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र १०) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानासाठीची सर्व तयारी झालेली आहे. आता जागरूक मतदार म्हणून लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करुयात.
०००
वंदना रघुनाथराव थोरात, विभागीय संपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
The post यंत्रणेची झाली पूर्ण तयारी…मतदार राजाची आता जबाबदारी first appeared on महासंवाद.