राजकीय पक्ष अन् उमेदवारांच्या जाहिरातींवर ठेवून आहे लक्ष…; माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती कक्ष..!

भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गमित होताच दि.15 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दूरचित्रवाहिनी, रेडिओ, चित्रपटगृहे, सोशल मिडिया इत्यादी ठिकाणी प्रसारित करण्यात येणाऱ्या निवडणूक विषयक जाहिरातींच्या संदर्भात पूर्व प्रमाणपत्र देण्यासाठी व निवडणूकीतील पेड न्यूज पडताळणी करण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee – MCMC) गठीत करण्यात येते. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवू, या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज..

ठाणे जिल्ह्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे अध्यक्ष आहेत, तर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, राष्ट्रीय वृत्तसंस्था पीटीआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार श्री.रामकृष्णन अय्यर, समाज माध्यम तज्ञ प्रसाद कुलकर्णी हे सदस्य तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

एम.सी.एम.सी.ची कर्तव्ये :-

या स‍मितीमार्फत निवडणूकीतील विविध प्रकारच्या जाहिरातींवर लक्ष ठेवले जाते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराशी संबंधित इतर माध्यमांमध्ये (प्रथित किंवा अप्रथित) राजकीय जाहिरातींचे खर्चाच्या अनुषंगाने देखरेख करणे, ज्यामध्ये उमेदवार, स्टार प्रचारक किंवा इतर व्यक्तींनी उमेदवाराच्या निवडणूक संधींवर परिणाम करण्यासाठी केलेली जाहिरात, प्रचार किंवा आवाहन यांचाही समावेश असेल.

प्रिंट मीडियामध्ये प्रकाशित कोणत्याही जाहिरातीचे निरीक्षण करणे, जर ती उमेदवाराच्या संमतीने किंवा माहितीने प्रकाशित केली असेल, तर ती उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल. तथापि, जर ती जाहिरात उमेदवाराच्या अधिकृततेशिवाय प्रकाशित केली असेल, तर प्रकाशकाविरुद्ध IPC च्या 171H कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल खटला चालविण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते.

आरपी ॲक्ट, 1951 च्या कलम 127A अंतर्गत निवडणूक पत्रक, पोस्टर, हँडबिल आणि इतर दस्तऐवजांवर प्रकाशक आणि मुद्रकाची नावे व पत्ते छापलेली आहेत का, याची तपासणी करणे.

प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक जाहिरातीवरील किंवा बातमी प्रकाशित करण्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने, प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाबाबत दैनिक अहवाल लेखा पथकाला सादर करणे, ज्याची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी आणि खर्च निरीक्षकांना पाठविली जाते.

एमसीएमसीद्वारे पार पडणारे कार्य :-

राजकीय जाहिरातींचे (छापील / व्हिडिओ / जिंगल्स / सोशल मीडिया रिल्स स्वरूपातील जाहिराती) पूर्व-प्रमाणीकरण.
पेड न्यूजच्या तक्रारी/मुद्यांची तपासणी करणे.
इलेक्ट्रॉनिक मीडियामधील राजकीय जाहिरातींवर लक्ष ठेवणे, जाहिरातींचे प्रसारण केवळ समितीच्या प्रमाणपत्रानंतरच झाले आहे, याची खात्री करणे.

जाहिरात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

1.अर्जाचा फॉर्म

2.जाहिरातीत वापरलेली भाषा (जाहिरात दोन प्रतांसह इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करावयाची आहे व त्यासोबत प्रमाणित केलेली ट्रान्सक्रिप्टही जोडणे आवश्यक आहे)

3.ऑडिओ तसेच व्हिडिओ जाहिरात पेन ड्राईव्हमध्ये द्यावी

4.सुचविलेल्या प्रसारणाचा अंदाजे खर्च व त्या प्रसारणातील विविध प्रसारणांची संख्या आणि दर यांचे विभाजन

5.प्रसारण कोठे करावयाचे आहे याबाबतचा खर्चाचा तपशील

6.मतदानाच्या दिवशी आणि मतदानपूर्व दिवशी वर्तमानपत्रात जाहिरातीचा मजकूर तपासणे अनिवार्य आहे.

ठाणे जिल्ह्याकरिता कार्यान्वित असलेल्या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीने दि.14 नोव्हेंबर 2024 पर्यंत 111 अर्जांचे प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. यामध्ये 328 व्हिडिओ, 46 ऑडिओ, 106 डिजिटल पोस्टर, 5 पथनाट्य, 2 आयविआर कॉल, 1 टेक्स्ट एसएमएस व 1 व्हॉट्सॲप मेसेज अशा 487 मजकूर प्रमाणित करून दिले आहेत.

मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या जाहिरातींना ‘एमसीएमसी’चे प्रमाणिकरण बंधनकारक

कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दि.20 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) यांच्याकडून पूर्व-प्रमाणित केली जात नाही तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये. भारत निवडणूक आयोगाच्या या निर्देशाचे सर्व राजकीय पक्ष व त्यांच्या अधिकृत उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकावू, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये. ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होवू नयेत, याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दि.20 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात,जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना या कालावधीत प्रिंट माध्यमांमध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (MCMC) कडे जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे अर्ज करावा, अशा सूचनाही निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

दि.13 ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत निवडणूक निकालाचे अंदाज प्रसारित करण्यास प्रसारमाध्यमांना प्रतिबंध

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) दि.13 नोव्हेंबर 2024 सकाळी 7.00 वाजेपासून ते दि.20 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध केल्याचे कळविले आहे. सर्व प्रसारमाध्यमांनी (प्रिंट मीडिया/ इलेक्ट्रॉनिक मीडिया/ सोशल मीडिया इत्यादी) या अधिसूचनेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

00000

मनोज सुमन शिवाजी सानप, 

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

तथा नोडल अधिकारी, एकत्रित मीडिया कक्ष आणि

सदस्य सचिव माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, ठाणे

 

The post राजकीय पक्ष अन् उमेदवारांच्या जाहिरातींवर ठेवून आहे लक्ष…; माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती कक्ष..! first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *